टीम AM : सरकारी कामांसाठी महसूल कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (SDO), तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना सर्व कार्यालयीन दिवशी दुपारी 3 ते 5 ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी अनिवार्यपणे राखीव ठेवावी लागणार आहे.
महसूल विभागाने यासंदर्भातील शासन परिपत्रक क्र. बैठक – 2026/प्र.क्र.72/समन्वय – 03 दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केले आहे. या दोन तासांच्या कालावधीत अधिकारी नागरिकांच्या अडचणी, तक्रारी आणि प्रलंबित कामांबाबत थेट संवाद साधणार आहेत.
या निर्णयामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची किंवा तासनतास प्रतीक्षा करण्याची गरज कमी होणार आहे. तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि उत्तरदायी होण्यास मदत होणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.



