टीम AM : अंबाजोगाई शहरातील सदर बाजार परिसरातील एका चायनीज सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई करत अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून संबंधित सेंटर सील केली आहे. निकृष्ट दर्जाचे व अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ विक्री होत असल्याच्या ऑनलाइन तक्रारीची तातडीने दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता अन्न सुरक्षा अधिकारी अ. दि. नरवाडे यांच्या पथकाने सदर बाजार येथील तवक्कल चायनीज सेंटर येथे तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित सेंटर आवश्यक परवान्याशिवाय सुरू असल्याचे तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या साहित्याचे व अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 अंतर्गत आवश्यक परवाना प्राप्त होईपर्यंत संबंधित सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, कारवाईची माहिती परिसरात पसरताच सदर बाजारातील अनेक हॉटेल्स व मांसविक्रीची दुकानेही खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने बंद करण्यात आली. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अंबाजोगाईकरांनी समाधान व्यक्त केले असून, शहरातील इतर खाद्य व्यवसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे.



