टीम AM : ‘महावितरण’ च्या अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता मनिष डाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी 5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा एक्वा प्लांट असून त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावावर सही करून मंजुरी देण्यासाठी कार्यकारी अभियंता मनीष डाकरे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराने ‘एसीबी’ कडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ‘एसीबी’ ने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. सापळ्यादरम्यान डाकरे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’ च्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे ‘महावितरण’ विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.



