टीम AM : एकीकडे जगभरात पैशांसाठी फसवणूक, चोरी आणि विश्वासघाताच्या घटना घडत असताना, दुसरीकडे अंबाजोगाई – परळी मार्गावर प्रामाणिकपणाचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. शेख जावेद शेख नूर यांच्या प्रामाणिकपणामुळे एका कुटुंबाला आपला मौल्यवान ऐवज सुखरूप परत मिळाला.
शेख अजीज भाई आणि शेख शहेनाझ हे दोघे ऑटो रिक्षाने अंबाजोगाईहून परळीकडे जात असताना शेपवाडीजवळ त्यांची पर्स रिक्षामधून खाली पडली. या पर्समध्ये 10 हजार रुपये रोख रक्कम, 2 तोळे सोन्याचे दागिने तसेच महत्त्वाचे आधार कार्ड होते. पर्स हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबाची चिंता वाढली.
दरम्यान, अंबाजोगाईहून परळीकडे जात असलेले शेख जावेद शेख नूर यांना शेपवाडीजवळ ही पर्स सापडली. पर्समध्ये मोठी रक्कम, सोन्याचे दागिने आणि ओळखपत्र असल्याचे दिसूनही त्यांनी कोणताही मोह न बाळगता प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला.
पर्समधील आधार कार्डाच्या मदतीने त्यांनी मालकाचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी शेख अजीज भाई यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर चहा-पाण्याचे आदरातिथ्य करून 10 हजार रुपये, 2 तोळे सोने आणि इतर कागदपत्रांसह पर्स जशीच्या तशी त्यांच्या स्वाधीन केली.
या घटनेमुळे शेख अजीज भाई यांच्या कुटुंबाचा हरवलेला आनंद परत मिळाला. आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या युगात शेख जावेद शेख नूर यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा आणि माणुसकी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. शुक्रवार, 11 जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर परिसरातून शेख जावेद शेख नूर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून, त्यांच्या या उदात्त कृतीला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे.



