‘घाटनांदूर – श्रीगोंदा’ रेल्वे मार्गाची 2959.57 कोटींची फाइल धूळखात : आता तरी लक्ष द्या, अंबाजोगाईकरांची खासदारांना आर्त हाक…!

टीम AM : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘घाटनांदूर – श्रीगोंदा’ रेल्वे मार्ग प्रकल्पाची तब्बल 2959.57 कोटी रुपयांची फाइल रेल्वे बोर्डाच्या कपाटात धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकल्पाबाबत बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित पाठपुरावा होत नसल्याने अंबाजोगाईकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अंबाजोगाई, केज, पाटोदा, आष्टीसह परिसरातील लाखो नागरिकांच्या दृष्टीने हा रेल्वे मार्ग विकासाचा महामार्ग मानला जातो. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा होत असली, तरी प्रत्यक्षात फाइल पुढे सरकत नसल्याने जनतेच्या आशा – अपेक्षांवर पाणी फिरत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बीड आणि अहिल्यानगरच्या खासदारांनी संसदेत, रेल्वेमंत्रालयाकडे आणि रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा केला असता, तर या प्रकल्पाला गती मिळाली असती. मात्र, या प्रश्नावर आवश्यक तेवढी आक्रमक भूमिका दिसून आली नाही. परिणामी, हजारो कोटी रुपयांच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाची फाइल आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

‘घाटनांदूर – श्रीगोंदा’ रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास अंबाजोगाईला पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे. औद्योगिक, शैक्षणिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प केवळ रेल्वे मार्ग नसून संपूर्ण प्रदेशाच्या विकासाची जीवनवाहिनी मानला जात आहे.

दरम्यान, अंबाजोगाईकरांनी आता लोकप्रतिनिधींना थेट सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे. “निवडणुकांवेळी विकासाची आश्वासने देणारे खासदार आता या प्रकल्पासाठी दिल्ली दरबारी किती वेळा गेले ? रेल्वे बोर्डाकडे नेमका काय पाठपुरावा केला ?” असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

‘घाटनांदूर – श्रीगोंदा’ रेल्वे मार्गाची फाइल रेल्वे बोर्डाच्या कपाटातून बाहेर काढून प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल,’ असा इशाराही विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून देण्यात येत आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी एकमुखी मागणी अंबाजोगाईसह संपूर्ण परिसरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here