टीम AM : अंबाजोगाईत सध्या सत्ताधारी ढिगभर पण कोणाचाच कोणावर अंकुश नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्याने अंबाजोगाई येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सह दुय्यम निबंधक वर्ग – 2 कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनाला तब्बल एक महिना उलटून गेला असतानाही संबंधित कार्यालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर झाले नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या इमारतीतील फर्निचरची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेट या सारख्या काही महत्त्वाच्या सुविधा आणि अंतर्गत कामेही अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज नव्या इमारतीत सुरू करता आलेले नाही. यामुळे उद्घाटनाच्या वेळी प्रशासनाने घाई का केली ? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. इमारत पूर्णपणे तयार नसताना केवळ उद्घाटनाचा सोहळा उरकण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला का ? अशी चर्चाही शहरात रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांना आधुनिक आणि सुसज्ज सुविधा मिळाव्यात या उद्देशाने नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात उद्घाटनानंतरही जुनेच कार्यालय सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे. अनेक जणांना नव्या इमारतीत सेवा सुरू झाल्याचा समज झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक पैशातून उभारण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण झाली होती का ? याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणीही काही नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासनाने स्थलांतराचा नेमका मुहूर्त कधी ठरवला आहे आणि उर्वरित कामे कधी पूर्ण होणार आहेत ? असा सवाल अंबाजोगाईरांच्या वतीने विचारण्यात येत आहे.



