मुंबई उगीच मोठी नाही, व्हायरल पोस्टला तात्काळ प्रतिसाद : अंबाजोगाईत मात्र विकासाच्या प्रश्नांवर शांतता…!

टीम AM : मुंबईतील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टची तात्काळ दखल घेत महापौर रितू तावडे यांनी दादर (पूर्व) येथील हिंदमाता उड्डाणपूल परिसर खालील स्केट पार्कला अचानक भेट दिली. या ठिकाणची दुरवस्था झाल्याचे ध्वनीचित्रफितीद्वारे समोर आल्यानंतर महापौरांनी स्वतः पाहणी करत तातडीने स्वच्छता व दुरुस्ती मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले.

या घटनेनंतर मुंबई महापालिकेची जलद प्रतिसाद क्षमता आणि लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर उठलेल्या नागरिकांच्या आवाजाला प्रशासनाने दिलेली तत्काळ दखल ही शहराच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीचे उदाहरण मानले जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे अंबाजोगाईमध्ये मात्र विकासाच्या मुद्द्यांवर सध्या उदासीनता दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. अंबाजोगाई सारख्या चळवळीच्या शहरात मूलभूत विकास प्रश्नांवर लोकप्रतिनिधी फारसे सक्रिय नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या काळात मोठमोठी विकासाची आश्वासने दिली जातात, मात्र निवडून आल्यानंतर त्या आश्वासनांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी नाराजी अंबाजोगाईकरांमध्ये वाढताना दिसत आहे. स्थानिक प्रश्न, सुविधा आणि नागरी समस्या याकडे लक्ष देण्याऐवजी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचेही दिसून येत आहे.

या परिस्थितीचा परिणाम अंबाजोगाईच्या विकासावर होत असून, नागरिकांनी आता अधिक दक्ष राहून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा जाब लोकप्रतिनिधींना विचारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच उत्तरदायित्वाची भावना निर्माण झाली तरच शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी भावना अंबाजोगाईकरांच्या वतीने व्यक्त ‌करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here