टीम AM : अंबाजोगाई शहरात विकासाच्या नावावर फक्त पोकळ गप्पा मारत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. दिवसेंदिवस वाढत्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचं आहे. परंतू, हे सिग्नल चालू करण्याची ताकदही लोकप्रतिनिधीमध्ये नाही, अशी भावना अंबाजोगाईकर व्यक्त करीत आहेत. अंबाजोगाईत मात्र वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. त्यामुळे “अंबाजोगाईत सिग्नल यंत्रणा कधी सुरू होणार ?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अंबाजोगाई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र, वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहनचालकांमध्ये शिस्त दिसून येत नाही. परिणामी, “मी जाऊ का ? तू जा ?” अशा गोंधळातून अनेक ठिकाणी किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत आहेत.
अंबाजोगाई शहरात काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात ती सुरळीत सुरू होती आणि वाहतुकीला काही प्रमाणात शिस्त लागली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही यंत्रणा बंद पडली. नंतर नगरपरिषदेकडून पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, पण नियंत्रणाच्या प्रश्नावरून ती पुन्हा बंद करण्यात आली. आजही शहरातील अनेक चौकांमध्ये सिग्नल उभे असले तरी ते केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या यंत्रणा पूर्ववत सुरू करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.



