टीम AM : अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात एका नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. गणेश दत्तू कोळी (मूळ रा. नांदुर्गा, ता. औसा) असे मृत तरुणाचे नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माहितीनुसार, गणेश कोळी यांचा विवाह 13 मे 2026 रोजी बीड येथील दिपाली यांच्याशी झाला होता. दिपाली या अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत. विवाहानंतर हे दाम्पत्य मोरेवाडी परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.
सोमवारी दुपारी पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर गणेश यांनी राहत्या खोलीत गळफास घेतल्याचे समोर आले. घटना लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून मंगळवारी शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आत्महत्येमागील कारणांचा पोलीस तपास सुरू आहे.



