टीम AM : ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाई शहराला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रशासनाला आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, शहराच्या पाहणीसह अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत आता नव्या चर्चेला उधाण आले आहे. “पुस्तकांचे गाव करण्यासाठी पुढाकार घेतला जातोय, पण मराठी भाषेच्या विद्यापीठाच्या मागणीबाबत मात्र लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेतली नाही,” अशी भावना शहरात व्यक्त होत आहे.
अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर आंदोलन करण्यात आले. अंबाजोगाईकरांनी वेळोवेळी उपोषण, धरणे आंदोलन आणि निवेदने देत शासनाकडे मागणी लावून धरली होती. विशेष म्हणजे मराठी साहित्य संमेलन तसेच विश्व मराठी साहित्य संमेलनातही अंबाजोगाई येथे मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करावे, असा ठराव पारित करण्यात आला होता.
मराठीचे आद्यकवी मुकंदराज स्वामी यांची समाधी अंबाजोगाई येथे असल्यामुळे या शहराला मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टीने विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे मराठी विद्यापीठासाठी अंबाजोगाई हा सर्वात योग्य पर्याय असल्याचे मत साहित्यप्रेमी आणि नागरिक सातत्याने व्यक्त करत आले आहेत.
मात्र, शासन दरबारी ही मागणी प्रभावीपणे मांडण्यात स्थानिक आमदारांना यश आले नाही आणि हे विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात आले. “पुस्तकांच्या गावासाठी आमदारांनी लक्ष घातले, पण मराठी विद्यापीठाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले,” अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
दरम्यान, अंबाजोगाईला ‘पुस्तकांचे गाव’ ही नवी ओळख मिळण्याची शक्यता असली, तरी मराठी विद्यापीठाच्या दीर्घकालीन मागणीबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढे काय भूमिका घेतात, याकडे आता अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे.
मराठी विद्यापीठाच्या उपकेंद्राची मागणी
महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात आले आहे. मात्र, मराठीचे आद्यकवी मुकंदराज स्वामी यांची भूमी असलेल्या अंबाजोगाईला या विद्यापीठाचे उपकेंद्र मिळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अंबाजोगाईला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विकसित करण्यासाठी हालचाली सुरू असताना, आमदार नमिता मुंदडा यांनी मराठी भाषा विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीही शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता अंबाजोगाईला उपकेंद्र मिळाल्यास शहराच्या शैक्षणिक ओळखीला मोठे बळ मिळेल, असे मत अंबाजोगाईकरांकडून व्यक्त होत आहे.



