‘स्वाराती’ तील‌ मोरेवाडी -‌ चनईला जोडणारा चौक अंधारात‌ : अपघाताची भीती वाढली…!

तातडीने पथदिवे बसवण्याची मागणी

टीम AM : अंबाजोगाई शहरालगतच्या ‘स्वाराती’ परिसरातील मोरेवाडी आणि चनई गावांना जोडणारा महत्त्वाचा चौक सध्या पूर्णपणे अंधारात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसराचा विस्तार वाढल्याने हा चौक आता मोठ्या वाहतुकीचा केंद्रबिंदू बनला आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी अद्याप पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठा धोका पत्करावा लागत आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी चौकात संपूर्ण अंधार असल्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच नागरिकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चौक मोठा असल्याने समोरून येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. नागरिकांनी अनेकदा या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

मोरेवाडी आणि चनई या दोन्ही मार्गांवर वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे अंबाजोगाई तालुका प्रशासन, नगरपरिषद प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या चौकात तातडीने पथदिवे बसवून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here