टीम AM : ऐतिहासिक आणि शैक्षणिक परंपरा लाभलेल्या अंबाजोगाई शहराला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रशासनाला पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, या उपक्रमासाठी स्थानिक स्तरावर प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईकरांनी विकासाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
“पुस्तकांचं गाव करायला हरकत नाही, पण आधी विकासाचं गाव करा,” अशी भावना आता शहरातून व्यक्त होत आहे. अंबाजोगाई शहरात आजही मागासवर्गीय वस्त्यांत खराब रस्ते, अपुरी पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छतेचे प्रश्न, वाहतूक कोंडी, बेरोजगारी आणि नागरी सुविधांच्या अभावासारख्या अनेक समस्यांना नागरिक सामोरे जात आहेत. त्यामुळे केवळ नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून उपयोग नसून शहराच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे अंबाजोगाईकरांचे म्हणणे आहे.
विशेषतः मराठवाड्याचं पुणे म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईमध्ये शिक्षणासोबतच स्वच्छ परिसर, सुरक्षित वाहतूक, चांगल्या आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. “ग्रंथ संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न चांगला आहे; पण नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर केल्याशिवाय शहराचा खरा विकास होणार नाही,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
अंबाजोगाईला ‘पुस्तकांचे गाव’ ही ओळख मिळाल्यास शहराच्या सांस्कृतिक प्रतिमेला नक्कीच बळ मिळेल. मात्र, त्याचवेळी शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा आणि नागरी प्रश्न सोडवण्याकडे लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे.



