‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे अंबाजोगाईपर्यंत : ‘सीबीआय’ ची गुप्त चौकशी, दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त…!

टीम AM : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाने आता मराठवाड्यातही वेग घेतला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) पथकाने बुधवारी अंबाजोगाई शहरात गुप्तपणे येत एका शिक्षिकेच्या दोन संशयित (मुलांची) विद्यार्थ्यांची सखोल चौकशी केली. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यासह शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, ‘सीबीआय’ चे विशेष पथक आज सकाळीच अंबाजोगाईत दाखल झाले. स्थानिक स्तरावर कोणतीही माहिती बाहेर न देता पथकाने थेट संशयित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांची जवळपास दोन तास चौकशी केली. चौकशीनंतर दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि मेमरी कार्ड तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हे विद्यार्थी लातूर येथे राहून नीट परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळे तपासाची दिशा आता लातूरमधील कोचिंग नेटवर्क आणि संभाव्य रॅकेटकडे वळल्याची चर्चा सुरू आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, डिजिटल पुराव्यांच्या आधारे ‘सीबीआय’ पुढील तपास करत आहे.

जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील चॅट्स, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल माहितीच्या आधारे या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही बीड आणि लातूर जिल्ह्यातील काही संशयितांची नावे समोर आल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. अंबाजोगाईत झालेल्या या कारवाईनंतर ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती मराठवाड्यात किती खोलवर आहे, याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here