टीम AM : अंबाजोगाई शहरात कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामं सुरू आहेत. कालपरवाच आमदार नमिता मुंदडा यांनी शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे क्रांतीनगरसारख्या मागासवर्गीय वस्त्यांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. येथील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून “रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता” असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. या खराब रस्त्यांचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना सहन करावा लागत आहे.
शाळेत जाताना किंवा खेळताना चिमुकल्यांना वारंवार ठेचा लागत असून अनेकदा किरकोळ दुखापती होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “या ठेसांच्या वेदना नगराध्यक्षांना जाणवतील काय” ? असा सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करत आहेत. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा तसेच नगरपरिषद प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, अंबाजोगाई शहरातील विकासकामांमध्ये सर्व भागांना समान न्याय मिळावा आणि क्रांतीनगरसारख्या भागांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



