मुंदडांना जे जमलं नाही ते‌ ठोंबरेंनी केलं…केज तालुक्यात औद्योगिक क्रांतीचे नवे पर्व : मुंडे सूतगिरणीचा प्रकल्प यशस्वी…!

पहिला सुताचा गाठ्ठा विक्रीसाठी इचलकरंजी बाजारपेठेत रवाना : माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या नेतृत्वाचे यश

टीम AM : केज तालुक्याच्या औद्योगिक विकासात मैलाचा दगड ठरेल, अशा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीने उत्पादनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गिरणीचा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित झाला असून, गिरणीत उत्पादित झालेल्या पहिल्या सुताचा (Yarn) विक्री शुभारंभ नुकताच इचलकरंजी येथील बाजारपेठेत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 

इचलकरंजी मार्केटमध्ये सुताच्या विक्रीचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाश आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, आणि प्रसिद्ध सूत व्यापारी अरुण कुमार गोयंका यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजेश पाटील, उल्हास सूर्यवंशी, गिरणीचे कार्यकारी संचालक अनिल पाखरे आणि इचलकरंजीतील अनेक नामवंत उद्योजक उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प संगीता ठोंबरे, उपाध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे आणि संचालक मंडळाच्या अथक परिश्रमामुळे मार्गी लागला आहे. 

प्रकल्पामुळे केज तालुक्यात होतील महत्त्वपूर्ण बदल 

सूतगिरणीच्या प्रकल्पामुळे शेकडो तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता त्यांचा माल विकण्यासाठी लांब जावे लागणार नाही; त्यांना हक्काची बाजारपेठ केजमध्येच मिळणार आहे. गिरणी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील पैशांची फिरकी वाढून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण : संगीता ठोंबरे

सूतगिरणीच्या यशाबद्दल बोलताना माजी आमदार संगीता ठोंबरे म्हणाल्या की, ‘स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे हे स्वप्न होते. महाराष्ट्र सरकारचा वस्त्रोद्योग विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. इचलकरंजीसारख्या मोठ्या बाजारपेठेत आपल्या गिरणीचे सूत पोहोचणे, हा आमच्या कामगारांच्या कष्टाचा विजय आहे. केज तालुक्याचा कायापालट करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.’ सूतगिरणीच्या या यशामुळे संपूर्ण केज तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून ठोंबरे दांपत्याचे आणि संपूर्ण संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.

मुंदडांना जे जमले नाही ते‌ ठोंबरेंनी केलं…

केज मतदार संघात ‌गेल्या अनेक ‌वर्षांपासून‌‌‌ मुंदडा कुटुंबीयांची निर्विवाद सत्ता आहे. यातील माजी आमदार संगिता ठोंबरे आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे‌ यांचा अपवाद वगळता मुंदडा कुटुंबीयांनी दीर्घकाळ केज मतदार संघावर आपले वर्चस्व गाजविले आहे. परंतू, केज‌ मतदार संघाच्या ‌विकासासाठी‌ आणि येथील ‌बेरोजगार तरुणांसाठी त्यांना ठोस भूमिका घेता आली नाही. किंबहुना एकही औद्योगिक ‌प्रकल्पाची उभारणी मतदार संघात करता आली नाही. त्यामुळे ‌केज मतदार संघात ‌मुंदडांना जे जमलं नाही ते‌ ठोंबरेंनी केलं, अशी चर्चा होताना दिसून येत आहे.