महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून ! योजनेसाठी अटी आणि निकष काय ? वाचा…!

टीम AM : गरीब व गरजू रुग्णांना आता पाच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या उपचारांसाठी शासकीय योजनेतून मदत मिळणार आहे. त्यासाठी म. ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य या एकत्रित योजनांचा विस्तार करण्यात आला आहे.

या योजनेची कार्यपद्धती स्पष्ट करणारा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे. यामुळे मोठ्या शस्त्रक्रियांना आर्थिक आधार मिळणार आहे.

रुग्णांना या शस्त्रक्रियांच्या उपचारांसाठी मिळेल मदत

अवयव प्रत्यारोपण (हृदय, यकृत, फुप्फुस इ.), कृत्रिम प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हृदय व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन आदी.

अर्ज प्रक्रिया कशी असेल ?

रुग्णालय रुग्णाच्या वतीने अर्ज करेल. आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असेल. ऑनलाइन प्रणाली विकसित होईपर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील. छाननी समिती तपासणी करून प्रस्ताव पाठवेल. वैद्यकीय व निधी मंजुरी समिती वैद्यकीय पडताळणी, निधी मंजूर करणे यासाठी दर शुक्रवारी बैठक घेईल. विशेष उपचार सहाय्यता व सक्षमीकरण समिती अंतिम मंजुरी देईल.

योजनेसाठी अटी आणि निकष काय ?

  • रुग्ण हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • आधार कार्ड, रेशन कार्ड अनिवार्य असेल.
  • मंजूर निधी रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
  • रुग्णाला रोख व्यवहार करण्याची गरज नाही
  • सर्व प्रक्रिया ऑनलाइन/पारदर्शक पद्धतीनेच होईल.

पाच लाखांपेक्षा अधिक खर्च असलेले उपचारही आता दोन्ही योजनांमधील रुग्णांना घेता येतील. या संबंधीची कार्यपद्धती निश्चित झाली असल्याने खर्चाची चिंता कोणीही करण्याची गरज राहिलेली नाही. – प्रकाश आबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here