कर्मचाऱ्याचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल…!
टीम AM : अंबाजोगाई शहरात सध्या सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामात नगर परिषद प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. सांडपाण्याने भरलेल्या नाल्यांची सफाई करताना स्वच्छता कर्मचाऱ्यांना साधे ‘हॅण्ड ग्लोज’ (हातमोजे) देखील पुरवण्यात आले नसल्याचे उघड झाले असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.
अंबाजोगाई शहरातील विविध भागांत नियमित नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, ही कामे करताना नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. अत्यंत घाण आणि घातक कचरा असलेल्या नाल्यांमध्ये उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने (Safety Gear) नसल्याचे दिसून आले. उघड्या हातांनी नाल्यामधील कचरा उपसतानाचा एका कर्मचाऱ्याचा फोटो सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
नाल्यातील सांडपाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस, कॉलरा, टायफॉइड आणि त्वचेचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. सरकारी नियमानुसार, स्वच्छता कर्मचाऱ्यांना गमबूट, मास्क आणि हातमोजे देणे बंधनकारक आहे. मात्र, अंबाजोगाई नगर परिषदेकडून या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे स्वच्छतेसाठी दरवर्षी मोठा निधी उपलब्ध असतो. असे असतानाही कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे ? हातमोजे सारख्या प्राथमिक वस्तू पुरवण्यास प्रशासनाला अडचण काय? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या हातांनाच जर सुरक्षितता नसेल, तर हे कसले प्रशासन ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. संबंधित प्रकरणाची दखल घेऊन नगराध्यक्षांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



