टीम AM : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणी अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांचा आज, 10 एप्रिल रोजी स्मृतीदिन आहे. 18 फेब्रुवारी 1965 रोजी जन्मलेल्या मुग्धा चिटणीस यांनी आपल्या एकमेव चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली.
1986 साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटातील ‘दृष्ट लागण्या जोगे सारे’ हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहे. या गाण्यातील ट्रेनमधील नव्या जोडप्याचा प्रवास, नव्या संसाराची स्वप्नं आणि भावनिक नात्यांची सुंदर मांडणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. या चित्रपटात त्यांनी अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत नव्या पिढीच्या जोडप्याचं प्रभावी प्रतिनिधित्व केलं होतं.
या चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायली होती, तर दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांनी अजिंक्य देव यांच्या आईची भूमिका साकारत सासू-सुनेच्या नात्याचं वास्तवदर्शी चित्रण केलं होतं.
विशेष म्हणजे, मुग्धा चिटणीस यांचा हा एकमेव चित्रपट ठरला. मात्र त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर एक उत्कृष्ट कथाकथनकार म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली होती. भारतासह अमेरिकेत त्यांनी सुमारे 500 कथाकथन कार्यक्रम सादर केले होते. तसेच मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरही त्यांनी अनेक कार्यक्रम केले.
मुग्धा चिटणीस यांचे उमेश घोडके यांच्याशी विवाह झाला होता. दुर्दैवाने, 10 एप्रिल 1996 रोजी कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीतून आणि चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.



