रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी पंकजा मुंडे यांचा ‘स्वाराती’ त आढावा : सुविधा वाढीसाठी दिल्या सूचना…!

टीम AM : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा शनिवारी पंकजा मुंडे यांनी घेतला. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरणारे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने आणि अधिक सक्षमपणे कार्यरत राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

रुग्णालयातील सोयी – सुविधांमध्ये वाढ करण्यावर विशेष भर देत त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. मनुष्यबळाची कमतरता, रिक्त पदांची भरती, कर्करोग उपचार केंद्राची उभारणी यासह रुग्णालय परिसरातील स्वच्छता, वृक्षारोपण, सोलर प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच, रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ, औषध पुरवठा आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्धतेबाबत संबंधित विभागांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर विभागनिहाय बैठका घेऊन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयाच्या सुरू असलेल्या तसेच नव्याने हाती घेण्यात आलेल्या बांधकाम कामांना निधीअभावी अडथळा येऊ नये, यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी युवानेते‌ अक्षय मुंदडा, अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here