विशेष प्रतिनिधी
टीम AM : “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले…” संत तुकाराम महाराज यांच्या या उक्तीचा प्रत्यय नुकताच राजेवाडी आणि पंचक्रोशीतील भाविकांना आला आहे. महाशिवरात्री निमीत्त सर्वत्र शिवनामाचा जयघोष होत असताना, श्री क्षेत्र निळकंठेश्वर देवस्थानच्या परिसरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. हा उत्साह केवळ सणवाराचा नाही, तर एका दिलेल्या शब्दाच्या पूर्ततेचा आहे.
समस्या डोंगराएवढी, पण जिद्द त्याहून मोठी
राजेवाडी येथील श्री क्षेत्र निळकंठेश्वर हे संपूर्ण पंचक्रोशीतील एक जागृत देवस्थान. श्रावण मास असो वा महाशिवरात्री, येथे भक्तांचा जनसागर लोटतो. मात्र, भौगोलिक परिस्थितीमुळे भक्तांची मोठी गैरसोय होत होती. मंदिर तीन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेले आणि एका बाजूला झुळझुळ वाहणारी निळगंगा नदी. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी, कीर्तनासाठी किंवा भजनासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नव्हती.
प्रदीप भैय्या ठोंबरे : एक आश्वासक नेतृत्व
गेल्या वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा प्रदीप भैय्या ठोंबरे यांनी मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर जागेची ही गंभीर समस्या मांडली. अनेकजण आश्वासनं देतात, पण भैय्यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. त्यांनी तात्काळ मंदिर परिसराची पाहणी केली आणि शब्द दिला की, “मी इंजिनीयर पाठवून आराखडा तयार करतो आणि हा परिसर विकसित करून देतो.”
दिलेला शब्द पाळणारे लोक विरळच असतात. पण प्रदीप भैय्यांनी या वर्षीचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होण्यापूर्वीच आपल्या ‘यश कन्स्ट्रक्शन’ ची सर्व यंत्रणा मंदिराच्या सेवेसाठी पाठवून दिली.
डोंगर फोडून मार्ग काढला
मंदिराच्या तीनही बाजूंना असलेला कठीण डोंगराळ भाग ब्लास्टिंगद्वारे सुरक्षितपणे हटवण्यात आला व यंत्रणेच्या साह्याने डोंगराळ भाग सपाट करून भाविकांसाठी प्रशस्त जागा निर्माण करण्यात आली. आज त्याच जागी भाविक शांतपणे बसून कीर्तन आणि भजनाचा आनंद घेत आहेत.
कृतज्ञता सोहळा
शब्दाला जागत निस्वार्थ भावनेने केलेल्या या कार्याबद्दल महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर समस्त पंचक्रोशीच्या वतीने प्रदीप भैय्या ठोंबरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा नसून, त्याने जपलेल्या ‘माणुसकी’ चा आणि ‘कर्तृत्वाचा’ सन्मान आहे.
प्रदीप भैय्यांसारख्या दानशूर आणि कार्यक्षम नेतृत्वामुळेच आज निळकंठेश्वर देवस्थानचा विकास होत आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे. भैय्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडत राहो, हीच नीळकंठेश्वर चरणी प्रार्थना.
कृतज्ञता पंचक्रोशीची
केवळ बोलणे सोपे असते, पण डोंगरासारखे कठीण काम पदरमोड करून पूर्ण करणे हे मोठ्या मनाचे लक्षण आहे. मंदिर विकासाचे राहिलेले कामही पूर्ण करण्याचा शब्द भैय्यांनी दिला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कार्यामुळे राजेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. “आज खऱ्या अर्थाने निळकंठेश्वराच्या दरबारात श्रद्धेसोबतचं सेवेचाही डोंगर उभा राहिला आहे.



