अंबाजोगाईतून जाणाऱ्या ‘शक्तिपीठ’ महामार्गात मोठा बदल : रस्ता ‘गेमचेंजर’ ठरणार, वाचा…!

टीम AM : महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रात सध्या क्रांती घडत आहे आणि याच मालिकेतील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या ‘शक्तिपीठ’ द्रुतगती महामार्गाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. नागपूर ते गोवा हा प्रवास वेगवान करण्यासाठी आखलेल्या या महामार्गाच्या मार्गात राज्य सरकारने मोठा बदल केला आहे. शेतकऱ्यांचा विरोध आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने हा मध्यमार्ग काढला असून, आता हा महामार्ग आणखी सोयीस्कर आणि राज्याच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे, आता हा हायवे थेट दुसऱ्या एका मोठ्या महामार्गाला जोडला जाणार आहे.

‘शक्तिपीठ’ महामार्ग आता थेट ‘कल्याण – लातूर जनकल्याण’ द्रुतगती महामार्गाशी जोडला जाणार आहे. सुरुवातीला या महामार्गाला काही ठिकाणी विरोध झाला होता, पण आता सुधारित संरेखनामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. या बदलामुळे महामार्गाची लांबी आता वाढून 840 किलोमीटर झाली असून, राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. आज जिथे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी 10 -12 तास लागतात, तिथे आता अवघ्या काही तासांत प्रवास पूर्ण होईल.

‘जनकल्याण’ महामार्ग (कल्याण ते लातूर) आणि ‘शक्तिपीठ’ महामार्ग यांचा संगम लातूर जिल्ह्यातील मुरूड (बार्शी रोड) येथे होणार आहे. येथे एक भव्य ‘इंटरचेंज’ उभारला जाईल. यामुळे लातूर, धाराशीव, नांदेड आणि परभणीच्या नागरिकांना मुंबई किंवा गोव्याला जायचे असेल, तर हा रस्ता ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. लातूर ते कल्याण हे अंतर आता अवघ्या साडेचार तासांत पार करता येईल. शेतकरी बांधवांसाठी आपला माल मुंबईच्या बाजारपेठेत किंवा बंदरात पोहोचवण्यासाठी ही एक सुवर्णसंधीच ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here