इंदापूर ‘एमआयडीसी’ ला 1000 एकर जमीन : अंबाजोगाईचा विकास मात्र रखडलेलाच…!

टीम AM : मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी मळ्यातील तब्बल 1000 एकर जमीन ‘एमआयडीसी’ कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. मात्र, दुसरीकडे केज मतदारसंघातील अंबाजोगाईसाठी ‘एमआयडीसी’ चा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने बेरोजगार तरुणांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अंबाजोगाईसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ‘एमआयडीसी’ ची मागणी होत असताना, प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस हालचाल होताना दिसत नाही. निवडणुका जवळ आल्या की, अंबाजोगाईतील तरुणांना ‘एमआयडीसी’ चे गाजर दाखविले जाते, परंतू, निवडणुका संपल्या की पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ च राहते, अशा प्रतिक्रिया अंबाजोगाईत उमटत आहेत.

विशेष म्हणजे, केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची ही दुसरी टर्म सुरू आहे. मात्र, ‘एमआयडीसी’ च्या बाबतीत त्यांनी आतापर्यंत फक्त निवेदन देण्यापुरतीच भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष कामकाजात मात्र कोणतीही ठोस प्रगती दिसत नाही.

इंदापूरसारख्या तालुक्याला हजारो एकर जमीन ‘एमआयडीसी’ साठी उपलब्ध करून दिली जाते, मग अंबाजोगाईतील ‘एमआयडीसी’ चा प्रस्ताव नेमका कुठे अडकलाय ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. परिणामी आता बेरोजगार तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली असून, ‘आमदार महोदयां अंबाजोगाई ‘एमआयडीसी’ साठी खरोखर पाठपुरावा करणार की नाही ?’ असा सवाल जोर धरू लागला आहे.

दरम्यान, अंबाजोगाईसाठी ‘एमआयडीसी’ मंजूर झाल्यास हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, उद्योगांना चालना मिळेल आणि परिसराचा विकास वेगाने होईल. मात्र, राजकीय इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याअभावी हा प्रश्न कायम रखडत असल्याची चर्चा जनतेमध्ये होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here