रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा : ‘डीवायएफआय’ युवक संघटनेचे बांधकाम विभाग कार्यालयावर निदर्शने

टीम AM : अंबाजोगाई – मोहा – सिरसाळा हा राज्य रस्ता तसेच परळी – नागापूर – बोधेगाव – मोहा हा जिल्हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत नादुरुस्त झाला असून या मार्गांवरून प्रवास करताना शेतकरी, विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तीन वर्षांपूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीला मंजुरी मिळूनही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्याप काम सुरू झालेले नाही. याशिवाय मुकुंदराज कढील रस्त्याचीही अवस्था अत्यंत खराब झाल्याने अनेक अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे.

या पार्श्वभूमीवर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) युवक संघटनेने रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आणत सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आज ‘डीवायएफआय’ च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दोन्ही रस्त्यांचे प्रश्न 10 फेब्रुवारीपर्यंत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास कार्यालयाचा ताबा घेऊन बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. रविंद्र देवरवाडे, व्यंकट ढाकणे, आबा कांबळे, प्रवीण देशमुख तसेच  ‘डीवायएफआय’ युवक संघटनेचे जिल्हा सचिव विशाल देशमुख, राज्य कमिटी सदस्य प्रशांत म्हस्के, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटोळे, राहुल भावटणकर, परळी तालुकाध्यक्ष विजय घुगे, मुंजा नवगरे, सिद्राम सोळंके, जगदीश देशमुख, अशोक वाघमारे, प्रशांत देशमुख, पृथ्वी देशमुख, प्रकाश कावळे, मदन राठोड, एकनाथ पांचाळ, अशोक जाधव, प्रकाश घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here