‘सिआरपीफ’ च्या सिमरन बाला इतिहास घडवण्यास सज्ज…!

टीम AM : जम्मू – काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील रहिवासी सिमरन बाला, 26 जानेवारी रोजी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इतिहास रचणार आहेत. त्या ‘सिआरपीफ’ च्या पुरुष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली 140 हून अधिक पुरुष सैनिक परेडमध्ये सहभागी होतील.

असिस्टंट कमांडंट सिमरन बाला एप्रिल 2025 मध्ये ‘सिआरपीफ’ मध्ये रुजू झाल्या. त्यांनी जम्मूच्या गांधी नगर येथील सरकारी महिला महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांची पहिली नियुक्ती छत्तीसगडच्या बस्तरिया बटालियनमध्ये झाली, जिथे त्यांनी नक्षलविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

‘युपीएससी’ ची ‘सिआरपीफ’ परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान त्यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी आणि सार्वजनिक वक्तृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुमारे 3.25 लाख कर्मचाऱ्यांसह ‘सिआरपीफ’ हे देशातील सर्वात मोठे अंतर्गत सुरक्षा दल आहे, जे नक्षलवाद, दहशतवाद आणि बंडखोरीविरुद्ध लढण्यात निर्णायक भूमिका बजावते. सिमरन बाला यांची ही कामगिरी देशातील लेकींसाठी प्रेरणा आणि आत्मविश्वासाचा संदेश देणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here