‘गुड न्यूज’ : अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ प्रसारण केंद्र लवकरचं सुरु होणार, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाईकरांना लवकरचं एक‌ ‘गुड न्यूज’ मिळणार आहे. कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ प्रसारण केंद्र मार्चअखेरपर्यंत सुरु होणार ‌आहे. लवकरच ‌धायगुडा पिपळा येथील आकाशवाणी केंद्रावर एक ॲन्टीना बसविण्यात येणार असून हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही प्रसारण सेवा कमी किलो वॅटवर असणार आहे. अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ केंद्र पूर्णत्वास येण्यास अजून दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात सुरु‌ करण्याचा निर्णय घेतला ‌आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

केंद्रातील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ प्रसारण केंद्राची निविदा ‌प्रक्रिया ‌पूर्ण केली असून एका संबंधित ‌कंपनीला हे टेंडर दिले गेले आहे. जवळपास हीच कंपनी देशातील 41 आकाशवाणी ‘एफएम’ केंद्राची उभारणी‌ करणार आहे. याच कंपनीने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे दोन वर्षांचा कालावधी मागितला असल्याने ‘एफएम’ केंद्राचं काम रखडले आहे. त्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ‘एफएम’ केंद्रात लागलीच तात्पुरत्या स्वरुपात सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ केंद्राची सेवा कमी किलो वॅटवर जरी सुरु होणार ‌असली तरी तिचा फायदा अंबाजोगाईसह आसपासच्या ‌तालुक्यांना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‌हस्ते ‌पायाभरणी…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ प्रसारण केंद्राची दूरदृश्य प्रणालीद्वारे काही ‌दिवसांपुर्वी पायाभरणी केली होती. हे ‘एफएम’ केंद्र 10 किलो वॅटचे आहे. अंबाजोगाई ‘एफएम’ केंद्र जवळपास 100 किलोमीटर अंतरावर सेवा पुरवणार आहे. अंबाजोगाई उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून ‘एफएम’ ची सेवा सुरू होण्यासाठी ‘गावकरी’, ‘अंबाजोगाई मिरर’ च्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. अगदी काही दिवसांपूर्वीच यासाठी पुढाकार घेऊन पत्रकारांच्या वतीने खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना निवेदन देण्यात आले होते. 

‘एफएम’ केंद्रासाठी 9 काेटी 62 लाख रुपयांच्या निधीसह मान्यता 

केंद्रातील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देशातील 14 राज्य व एका केंद्रशाषित प्रदेशात मिळून आकाशवाणी विभागाद्वारे हाेणारे माहिती प्रसारण, करमणूक, शैक्षणिक, आराेग्य आदी ज्ञानवाहक 41 फ्रिक्वेन्सी माॅड्यूलेशन (एफएम) केंद्रांना नुकतीच मान्यता देण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथील उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्राचा समावेश आहे. ‘एफएम’ केंद्र सुरू करण्यासाठी 9 काेटी 62 लाख रुपयांच्या निधीसह मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रावर 10 किलाे वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. धायगुडा पिंपळा या ठिकाणी पूर्वीपासूनच दूरदर्शनचा 150 मीटर उंच मनाेरा आहे. इतरही यंत्रणा कार्यान्वित आहे. 

अंबाजाेगाई केंद्राची क्षमता माेठी

देशातील इतर ठिकाणच्या तुलनेत अंबाजाेगाई केंद्राची क्षमता माेठी असेल. त्यापेक्षा माेठे गुजरातच्या भूजमधील आहे. तेथे 20 किलाे वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. अंबाजोगाई येथील उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून लवकरचं ‘एफएम’ ची सेवा सुरू होणार असल्याने रेडिओ प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे