परिवर्तन जनविकास आघाडीकडून नंदकिशोर मुंदडा तर लोकविकास महाआघाडीकडून सय्यद ताहेर यांची गटनेतेपदी निवड

नगरपरिषदेत सत्तासंघर्ष तीव्र होण्याची चिन्हे…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीनंतर गेले काही दिवस राजकीय वातावरण काहीसे शांत झाले होते. मात्र, नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी काल नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना काढलेल्या जंगी मिरवणुकीमुळे शहरातील राजकीय तापमान पुन्हा एकदा वाढले. त्यातच आज नगरपरिषदेतील दोन्ही आघाड्यांच्या गटनेत्यांच्या निवडी झाल्याने सत्तासंघर्षाची चर्चा अधिकच रंगू लागली आहे.

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन जनविकास आघाडीकडून नंदकिशोर मुंदडा यांचीच गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांच्या लोकविकास महाआघाडीकडून सय्यद ताहेर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या दोन्ही आघाड्यांच्या गटनेत्यांच्या निवडी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृतरित्या पार पडल्या. यावेळी दोन्ही आघाड्यांचे प्रमुख, नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गटनेत्यांच्या निवडी झाल्याने आता नगरपरिषदेतील राजकारण अधिक आक्रमक होण्याची शक्यता असून, आगामी काळात विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. अंबाजोगाई नगरपरिषदेत पुढील काळात नेमकी कोणाची बाजी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.