टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी व डोंगर पिंपळा शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सतिश केंद्रे यांच्यासह ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
दगडवाडी व डोंगर पिंपळा परिसर डोंगराळ व झाडीने व्यापलेला असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे मिळत आहेत. काही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत असून, शेतात वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसेही आढळून आले आहेत. त्यामुळे शेतात खुरपणी, कापणी तसेच पाणी भरण्यासाठी जाण्यास शेतकरी धजावत नाहीत.
विशेषतः पहाटे व संध्याकाळच्या वेळी शेतात जाणे जिवावर बेतू शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने पंचनामा करून पिंजरा लावणे, गस्त वाढवणे व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देणे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परिसरात कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



