टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’ ठेवण्यात आलेल्या ‘स्ट्रॉंग रूम’ परिसरात अत्यंत कडक आणि पारदर्शक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण यंत्रणा अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने उभी करण्यात आली आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीनंतर मतमोजणीसाठी शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशासनाच्या वतीने ‘स्ट्रॉंग रूम’ तयार करण्यात आली आहे. ही ‘स्ट्रॉंग रूम’ तयार करताना अंबाजोगाई तालुका प्रशासनाने पुर्ण खबरदारी घेतली आहे. ‘स्ट्रॉंग रूम’ परिसरात चोवीस तास पोलीस बंदोबस्त, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, अग्निसुरक्षा यंत्रणा तसेच प्रवेशावर कडक नियंत्रण ठेवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी ‘लाईव्ह’ निरीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांना ‘स्ट्रॉंग रूम’ वर थेट नजर ठेवता येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संशय अथवा अफवा यांना पूर्णविराम मिळाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे या ‘स्ट्रॉंग रूम’ वर आणि मतमोजणीच्या परिसरावर दक्षतेने लक्ष देत असून दररोज या परिसराचा आढावा घेत आहेत.
अंबाजोगाई तालुका प्रशासनाच्या या पारदर्शक आणि काटेकोर व्यवस्थेमुळे केवळ उमेदवारांमध्येच नव्हे, तर सर्वसामान्य मतदारांमध्येही निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. निष्पक्ष, स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या दिशेने अंबाजोगाई प्रशासनाने उचललेले हे पाऊल आदर्शवत ठरत आहे.



