अंबाजोगाईत कपबशी की छत्री…! राजकारण तापलं, चर्चांना उधाण, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक होऊन तब्बल दहा दिवसांचा काळ उलटून गेला असला तरी शहरात सध्या एकच चर्चेचा विषय ठाण मांडून बसला आहे. कपबशी की छत्री ? म्हणजेच नगराध्यक्षपदाची गादी अखेर कोणाला मिळणार ? निवडणूक संपली असली तरी तिचे राजकीय तापमान अजूनही उच्चांक गाठताना दिसत आहे.

लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे हा सामना चुरशीचा झाला. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी आपले बळ सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न केला. परिणामी केवळ अंबाजोगाई नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीवर केंद्रित झाले.

मोदी समर्थकांचा ठाम विश्वास, नगराध्यक्ष आमचेच, यात शंका नाही. तर मुंदडा यांचे कार्यकर्ते म्हणतात, नगरपरिषदेसाठी जनतेनेच आमच्यावर विश्वास ठेवलाय, सत्ता आमचीच येणार. यामुळे निवडणुकीत कोण वरचढ ठरणार ? हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. सामान्य नागरिकही या राजकीय कोंडीवर आपापल्या अंदाजांना उधाण देत आहेत. वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून नोकरदारांपर्यंत सगळीकडे फक्त निवडणूक निकालाचीच चर्चा.

अंबाजोगाई शहरात थंडी कडाक्याची असली तरी राजकारणाचा तडका मात्र प्रचंड गरम आहे. चहाच्या टपरीवर सकाळी गप्पांचा विषय कपबशीचा असेल, तर रात्री मित्रमंडळीत चर्चा छत्रीच्या शक्यता तपासण्याचीच. येत्या काही दिवसांत निकाल स्पष्ट होणार असला तरी अंबाजोगाईकरांची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतच आहे. अखेर नगराध्यक्ष पदाची बाजी कोण मारणार ? कपबशी की छत्री ? या चर्चांना मात्र उधाण आले आहे, हे मात्र निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here