टीम AM : अंबाजोगाईला ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून घोषित करण्यात आलं आणि शहरवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, या घोषणेनंतर प्रत्यक्षात किती पुस्तकवाचन वाढलं ? किती नव्या वाचनालयांची सुरुवात झाली ? याचा आढावा घेण्याची गरजच कुणाला वाटली नाही, हीच वस्तुस्थिती आहे.
सध्या अंबाजोगाईत गेल्या काही वर्षांपासून ‘निवेदनबाजी’ चा ट्रेंड चांगलाच फोफावला आहे. कोणतीही मागणी असो, सरळ निवेदन द्या आणि विषय संपवा, आपल्या बापाचं काय जातयं ? असा प्रकार सुरू आहे. पण निवेदन दिल्यानंतर त्या मागण्यांचा पाठपुरावा तर सोडाच, वर्षानुवर्षे त्या विषयाकडे साधं डोकावूनही पाहिलं जात नाही. ही केवळ औपचारिकता आणि जबाबदारी झटकण्याचा एक सोपा मार्ग बनला आहे. अशा राजकीय खेळींना आता अंबाजोगाईकर कंटाळले आहेत.
दुसरीकडे शहराच्या आणि परिसराच्या विकासाचे महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ आहेत. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा मुद्दा, बुटेनाथ साठवण तलाव, ‘एमआयडीसी’, टेक्सटाईल पार्क यांसारखे विषय केवळ कागदावरच अडकून पडले आहेत.
आता पुन्हा रेल्वेसाठी निवेदनांच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या लोकप्रतिनिधींनी कितीही निवेदने दिली, तरी प्रश्न मार्गी लागणार नाहीत, याची जाणीव अंबाजोगाईकरांना आता स्पष्ट झाली आहे. आज अंबाजोगाईला पुस्तकांचं नव्हे, तर ‘निवेदनांचं गाव’ अशी ओळख निर्माण होत आहे, हीच खरी शोकांतिका आहे. विकास हवा असेल तर निवेदन नव्हे, तर ठोस कृतीची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



