टीम AM : अंबाजोगाईचा भूमिपुत्र आणि नवोदित अभिनेता राहुल दराडे याच्या ‘कलवरी’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी शो ‘हाऊसफुल्ल’ होत आहेत. अंबाजोगाईतील मित्रपरिवाराने ‘मोहन सिनेमार्क’ मध्ये ‘कलवरी’ चित्रपटाचा ‘विशेष शो’ आयोजित केला होता. या ‘विशेष शो’ ला स्वतः राहुल दराडे उपस्थित होता. यावेळी त्याच्या मित्रपरिवाराच्या वतीने राहुलचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या ‘विशेष शो’ ला तरुणाईने तुफान गर्दी केल्याने अनेकांना सिटस् उपलब्ध न झाल्याने चित्रपट पाहता आला नाही.
अभिनेता राहुल दराडेने अंबाजोगाईकरांचे प्रेम आणि प्रतिसादाबद्दल आभार मानत, चित्रपटगृहात जाऊन ‘कलवरी’ नक्की पाहण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात 28 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कलवरी’ चित्रपटामध्ये राहुल दराडे आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री राजेश्वरी खरात मुख्य भूमिकेत झळकत आहेत. ग्रामीण लग्नसंस्कृती, परंपरा आणि नातेसंबंधांच्या सुंदर गुंफणीतून साकारलेली कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
पहिल्याच चित्रपटात दमदार अभिनय सादर केल्याबद्दल अंबाजोगाईचा तरुण कलाकार राहुल दराडेचे स्थानिक स्तरावर कौतुक होत आहे. ग्रामीण संस्कृतीचे वास्तव दर्शन घडवणारा ‘कलवरी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखा ठरत आहे.



