अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक : आज मतदान, मोदी – मुंदडात ‘कांटे की टक्कर’

मतदारांमध्ये उत्साह, सुरक्षा व्यवस्थेकडून कडक बंदोबस्त

टीम AM : नगरपरिषद निवडणूकीसाठी आज अंबाजोगाई शहरात मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासूनचं मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ वाढू लागली आहे. यंदाची निवडणूक प्रामुख्याने लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे ‌उमेदवार राजकिशोर मोदी आणि अंबाजोगाई शहर जनविकास परिवर्तन आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रतिष्ठेची ठरणार असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या मतदानाकडे लागले आहे.

नगरपरिषदेच्या निवडणूकीत गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांकडून प्रचाराचा वेग प्रचंड वाढला होता. घरदारी जनसंपर्क, विविध बैठका, सभांमधून विकासाच्या आश्वासनांचा पाऊस, तसेच प्रभागानुसार स्थानिक प्रश्नांची मांडणी करत मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला. दोन्ही गटांची ताकद जवळपास समान असल्याने लढत अधिकच चुरशीची बनली आहे.

मतदान केंद्रांवर वृद्ध, महिला आणि युवकांच्या सहभागाने लोकशाहीचा उत्सव रंगत चालला आहे. शहरातील विविध भागांत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांवर विशेष पथके तैनात करण्यात आली असून सीसीटीव्हीद्वारेही मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे. संवेदनशील मतदानकेंद्राची सीसीटीव्ही यंत्रणा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडली गेली आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

निवडणुकीचा निकाल कोणत्या दिशेने झुकतो यावर शहराच्या आगामी राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे. संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या गणितांना उधाण येईल, मात्र, खरा निकाल 21 डिसेंबरला मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. शहरवासीयांची उत्सुकता मात्र आजच्या मतदानात कोण वरचढ ठरतो याकडेच केंद्रित झाली आहे.