टीम AM : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. कोर्टानं मतमोजणीचा निर्णय पुढे ढकलला आहे. हायकोर्टाने हा मोठा निर्णय दिल्याने उमेदवारांवर टांगती तलवार आहे. उद्या मतमोजणी होणार नाही.
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी काही तासापुर्वी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेकांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर रोजीच मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा निकाल देताना मतमोजणी पुढे ढकलली आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या आहेत.
निवडणुकीची आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत असणार
काही नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका आणि काही प्रभागातील मतदान हे 20 डिसेंबर रोजी होणार आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन हायकोर्टाने एकाच दिवशी मतमोजणी करण्याचे आदेश दिले. आधीच निकाल जाहीर झाले असते तर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले असते, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एक्झिट पोलदेखील 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर जाहीर होणार आहेत. निवडणुकीची आचार संहिता ही 20 डिसेंबरपर्यंत असणार आहे.



