सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी कांग्रेसचा झेंडा नगरपरिषदेवर फडकवावा : जेष्ठ नेते कमाल फारुखी

टीम AM : अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी कॉंग्रेसचा झेंडा नगरपरिषदेवर फडकून राहुल गांधीचे हात मजबूत करा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमाल फारुखी यांनी केले. अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीत काँगस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असिफोद्दीन खतीब आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 30 डिसेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन केले होते. 

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील, ज्येष्ठ नेते ॲड. अण्णासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार असिफोद्दीन खतीब, तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे यांची उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना कमाल फारुखी म्हणाले की, काँग्रेसला फार मोठ्या इतिहासाची परंपरा आहे. परंतू, देशात काही राजकीय पक्ष जातीयवाद आणि धर्मवाद पसरत आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आहोत. देशात भाईचारा टिकवण्यासाठी आजच्या काळात काँग्रेसची नितांत गरज आहे. देशातील संविधान वाचवण्यासाठी आपण काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन फारुखी यांनी केले. 

सभेत बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक पाटील म्हणाले की, कांग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. पक्षाने अंबाजोगाई शहरातील अनेक नेते मोठे केले, त्यांना ताकद दिली. परंतू, आज ते आमच्यासोबत नाहीत. यावर कुठे तरी विचार करण्याची गरज आहे. अडचणीच्या काळात जो सोबत राहिल तोच खरा साथीदार आणि कार्यकर्ता असतो. सत्ता येत असते जात असते. येणाऱ्या काळात कांग्रेस पक्षालाही ‘अच्छे दिन’ येतील. त्यावेळेस नक्कीच या सोबत राहणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल, असे अशोक पाटील म्हणाले. अंबाजोगाई शहराला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी आपण कांग्रेस पक्षाला साध द्या आणि सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी ‌ॲड. अण्णासाहेब पाटील, बॅरिस्टर फारुखी, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे आणि उमेदवारांची दमदार भाषणं झाली. त्यांनीही विरोधकांवर सडकून टीका केली.

अंबाजोगाईत एकदिवसाआड पाणी : असिफोद्दीन खतीब

जाहीर सभेत बोलताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार असिफोद्दीन खतीब म्हणाले की, नगरपरिषदेच्या सत्तेची चावी आमच्या हातात द्या. विकासाची संकल्पना काय असते ते आम्ही दाखवून देऊ. शहरातील मूलभूत सुविधा, एकदिवसाआड पाणी, गोरगरिबांची घरं मालकी हक्कात घेणार आणि प्रत्येक प्रभागात आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करुन देणार असे म्हणत त्यांनी कांग्रेस पक्षाचा जाहिरनामा वाचून दाखविला. त्यासोबत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदासोबतचं सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. या जाहीर सभेला शहरातील सर्व प्रभागातून मतदारांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. घोषणाबाजी, जयजयकार आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मिळालेल्या प्रतिसादातून अंबाजोगाईत काँग्रेसच्या प्रचाराला चांगली गती मिळाल्याचे चित्र या सभेतून स्पष्ट दिसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here