अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक : सासऱ्यासाठी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, मोदी विरुद्ध मुंदडांत थेट सामना, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक प्रत्येक दिवशी अधिक रंगतदार होत असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषत: नगराध्यक्ष पदासाठीची लढत चुरशीची बनली असून दोन तगडे उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. लोकविकास महाआघाडीचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि जनविकास परिवर्तन आघाडीचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांच्यातील लढतचं आता शहराच्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे.‌ 

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या या निवडणुकीत दोन्ही गटांनी दमदार रणनीती आखली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पाहायला मिळत आहे. घरोघरी भेटी, पदयात्रा, संवाद बैठकांपासून ते सोशल मीडियापर्यंत प्रचाराचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. मतदारांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी विविध घोषणा, आश्वासने आणि विकासाचा रोडमॅप सादर केला जात आहे.

निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे नंदकिशोर मुंदडा यांच्या विजयासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. त्यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली असून शहरातील प्रत्येक प्रभाग, गल्लीबोळ, आणि मतदारसंलग्न भागात जाऊन सभा, भेटीगाठी, तसेच महिलांच्या आणि युवकांच्या स्वतंत्र बैठकांचे आयोजन सुरू आहे. दुसऱ्या बाजूला राजकिशोर मोदी यांचाही प्रचार जोमात असून त्यांना स्थानिक नेतृत्व, युवा पिढी आणि काही प्रभावी घटकांचा भक्कम पाठींबा मिळताना दिसत आहे. त्यांच्याकडूनही मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.

निवडणूक जशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा वेग आणखी वाढेल अशी चिन्हे आहेत. दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची लढत असल्याने ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिक आणि संघटनात्मक ताकदीचीही चाचणी ठरणार आहे. शेवटी मतदार कोणावर विश्वास ठेवतात, शहराच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे देतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र संपूर्ण अंबाजोगाईचं लक्ष या रोमहर्षक मुकाबल्यावर केंद्रित झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here