अजित पवारांची ग्वाही : अंबाजोगाई बदलणार, स्वच्छ – सुंदर शहर घडवणार, ‘स्वाराती’ साठी 1 हजार कोटी देणार, वाचा…

टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडे वर्षानुवर्षे योग्य लक्ष दिले गेले नाही. पण आता ही परिस्थिती बदलणार आहे. रुग्णालयाच्या विकासासाठी तब्बल 1000 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने देणार असून अंबाजोगाईतील आरोग्यसेवा अत्याधुनिक करणार, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अंबाजोगाईत आयोजित सभेत दिली.

अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीनिमित्त लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. वंजारी वस्तीगृह परिसरात अत्यंत उत्साहात झालेल्या या सभेला प्रचंड जनसमुदाय उसळला होता.

यावेळी आपल्या विस्तारीत भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले की, अंबाजोगाई नगरपरिषदेत गेल्या काही वर्षांपासून प्रशासकचं कारभार पहात होते. परंतू, प्रशासकांच्या काळात नगरपरिषदेचा वेग मंदावला. विकास ठप्प झाला. पण आता तोच वेग दुप्पट करायचा आहे. मी जशी बारामती बदलली, पिंपरी – चिंचवड बदलले, तसंच अंबाजोगाईही विकासाच्या बाबतीत बदलणार, अशीही ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, राजकिशोर मोदी यांच्या पुढाकारातून अंबाजोगाई शहर स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध करणार आहे. त्यासाठी राजकिशोर मोदी आणि लोकविकास महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. मी शब्दाचा पक्का असून दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करणार, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार यांच्या सभेला सर्व वयोगटातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महिलांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार पृथ्वीराज साठे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर, राजेसाहेब देशमुख, गोविंद देशमुख, राजाभाऊ औताडे, पत्रकार नानासाहेब गाठाळ, लोकविकास महाआघाडीचे नेते, पदाधिकारी, उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंदकिशोर मुंदडा दिशाभूल करणं थांबवा : राजकिशोर मोदी

नंदकिशोर मुंदडा यांनी माझ्या विरोधात 1000 अर्ज दिले, पण एकाही प्रकरणात ते माझ्यावरील आरोप सिद्ध करु शकले नाहीत, त्यामुळे लोकांची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं, अशी टीका लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी केली. अंबाजोगाईकर खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकविकास महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन राजकिशोर मोदी यांनी मतदारांना केले.

अजित पवारांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला अंबाजोगाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील वंजारी वस्तीगृहाच्या मैदानावर झालेल्या या सभेत सर्वच प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि ऊर्जा दिसून आली. शहरातील राजकीय वातावरण या सभेमुळे आणखी तापलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here