टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. प्रचार मोहिमांना वेग आला असून, विविध गट आपापल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्याविरोधात पुर्वी भाजपाकडून अक्षय मुंदडा तर आता नंदकिशोर मुंदडा यांचे नावं नाट्यमय घडामोडीनंतर काल समोर आले आहे. मोदी – मुंदडा गटाकडून सोशल मीडियावर सध्या ‘उचला सतरंज्याचा’ हा भन्नाट ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. या नव्या मोहिमेने शहरात चांगलीच खळबळ उडवली आहे.
या मोहिमेतून नागरिकांना एकच संदेश देण्यात येत आहे, ‘फक्त मतदान नाही, आता बदल घडवायचा ! युवक वर्गाकडून या ट्रेंडला मोठा प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ, रील्स, स्लोगन आणि पोस्ट्सचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. मोदी – मुंदडा गटाकडून या ट्रेंडद्वारे मतदारांना जागं करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मात्र, शहरातील अंबाजोगाईकरांचे खरे प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ च आहेत. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती, बुट्टेनाथ साठवण तलाव, ‘एमआयडीसी’, टेक्स्टाईल पार्कची उभारणी तसेच काळवटी साठवण तलावाची उंची वाढवण्यासारखे महत्त्वाचे विषय आजही केवळ कागदावरच अडकलेले आहेत. या गंभीर प्रश्नांवर कोणताही गट ठोस भूमिका घेताना दिसत नाही.
अंबाजोगाईकरांना आजही पाणीटंचाई, बेरोजगारी, उद्योगधंद्यांचा अभाव आणि अपुऱ्या मूलभूत सुविधांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत फक्त ट्रेंड आणि प्रचार मोहिमा पुरेशा आहेत का ? विकासाचा ‘रोडमॅप’ कोण देणार ? असा प्रश्न अंबाजोगाईकर विचारत आहेत. आगामी नगरपरिषद निवडणुकीत ट्रेंड आणि सोशल मीडिया मोहिमांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष विकासासाठी कोण पुढे येतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या मात्र ‘उचला सतरंज्याचा’ हा ट्रेंड शहराच्या राजकीय चर्चेचा हॉट टॉपिक बनला आहे.


