‘स्वाराती’ रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड
टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालयातील वाढत्या समस्या, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनाची निष्क्रिय भूमिका या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, शहराध्यक्ष इस्माईल गवळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारला.
‘स्वाराती’ रुग्णालय हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र असले तरी, गेल्या काही काळात येथे अनेक मूलभूत सेवा बंद पडल्या आहेत. रुग्णालयातील ‘सिटी स्कॅन’ मशीन गेल्या वर्षभरापासून बंद आहे, अनेक विभागांमध्ये तंत्रज्ञ व डॉक्टरांची कमतरता जाणवते, तर स्वच्छता व औषधसामग्रीचा गंभीर अभाव निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना योग्य उपचारासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांच्या सोबत रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, कर्मचाऱ्यांची टंचाई, तसेच रुग्णसेवेतील त्रुटींबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, जर तातडीने सुधारणा करण्यात आल्या नाहीत, तर पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने काही समस्या तांत्रिक व प्रशासकीय असल्याचे सांगत तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तरीही नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
‘स्वाराती’ रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड
अपघातात गंभीर जखमी रुग्णाला अनेक फ्रॅक्चर असूनही ‘स्वाराती’ रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, शहराध्यक्ष ॲड. इस्माईल गवळी यांच्यासह राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी यांनी अधिष्ठात्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रशासनाने चूक मान्य करत पुढील काळात अशा घटना होणार नाहीत, असे आश्वासन दिले.


