टीम AM : अंबाजोगाई शहरातील रिंगरोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत मुरलीधर गंगणे (वय 52, रा. राडी, ता. अंबाजोगाई) यांचा मृत्यू झाला. ते अंबाजोगाई येथील त्यांच्या घराकडे जात असताना हा अपघात झाला.
मानवलोक कार्यालयाजवळ कारने दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. चंद्रकांत गंगणे हे रांजणी येथील साखर कारखान्यात चीफ केमिस्ट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकाली मृत्यूची खबर येताच राडी गावावर शोककळा पसरली आहे.


