नगरपरिषद निवडणूक : मतदार याद्यात घोळ, मोदी ‌आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा, वाचा…

टीम AM : अंबाजोगाई शहरातील चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या प्रभाग फेररचने व मतदार याद्यांमधील नावांच्या अनाधिकृत अदलाबदली विरोधात आज दिनांक ‌13 आक्टोबर सोमवार रोजी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अंबाजोगाई यांना ‌राजकिशोर मोदी यांनी निवेदन दिले. यावेळी ‌राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे [अजित पवार] पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाने राजकीय दबावाखाली आणि काही व्यक्तींच्या सोयीसाठी प्रभाग रचना व मतदार याद्या तयार केल्या आहेत. या प्रक्रियेत अनेक ठिकाणी मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात हलवली गेली असून, किमान 200 ते 500 मतदारांची अदलाबदल अनाधिकृत पद्धतीने करण्यात आली आहे, असा आरोप मोदी यांनी केला आहे.

सर्वात धक्कादायक म्हणजे बऱ्याच ठिकाणी शहराबाहेरील तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची नावे नगरपरिषदेच्या मतदार याद्यांमध्ये आढळून आली आहेत, ज्यामुळे निवडणुकीची पारदर्शकता पूर्णपणे प्रश्नचिन्हाखाली आली आहे. मतदार याद्यांतील या गंभीर त्रुटींबाबत तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा समस्त अंबाजोगाईकरांच्या वतीने  उपोषण किंवा कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा यावेळी राजकिशोर मोदी यांनी दिला आहे.