महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अंबाजोगाईत ‘जनआक्रोश’ मोर्चा 

उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन : बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी

टीम AM : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वात आज अंबाजोगाई शहरात ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे आणि महाबोधी मंदिर अधिनियम 1949 रद्द करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. 

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघाला आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात ‘महाबोधी विहार मुक्त‌ करा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चातील घोषणेने संपूर्ण शहर दणाणले होते. या वेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन ‌देण्यात ‌आले.

मोर्चात अखिल भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सदस्य, समता सैनिक दलाचे स्वंयसेवक आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.