टीम AM : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या निवडणुका जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, 21 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 22 किंवा 23 जानेवारीला लगेच निकाल, असे वेळापत्रक निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय यंत्रणेतील अधिकृत सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली, तर निवडणुकांच्या तारखा 1 ते 10 डिसेंबरदरम्यान जाहीर करण्याचे नियोजन असल्याचेही या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नगरपंचायत, नगरपरिषद / महापालिकेची पायरी चढण्यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांची प्रतीक्षा आता संपणार असून, आता निवडणुका टप्प्यात आल्या आहेत.
1 ते 10 डिसेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा
नगरपंचायत, नगरपरिषद / महापालिका निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा 1 ते 10 डिसेंबरदरम्यान केली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया 45 दिवसांच्या आत पूर्ण करायची असल्याने 10 डिसेंबर ते 25 जानेवारी या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परिणामी डिसेंबर 2025 मध्येच निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांकडे आता तयारीसाठी तीन महिन्यांचा कालावधी असणार असून, नवरात्रीचा मुहूर्त साधत अनेकांना प्रचाराचा नारळ फोडावा लागणार आहे.



