अंबासाखरचा गळीत हंगाम दिपावलीपर्यंत सुरु होणार ‌: दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात

टीम AM : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या मील आणि कॅरीयर जोडणीसह दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यावर्षीचा गळीत हंगाम दिपावलीपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर आणि व्हाइस चेअरमन दत्ता पाटील यांनी दिली‌ आहे. 

राज्य शासनाकडून कारखान्यासाठी तब्बल 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून जुनी व निकामी मशीनरी बदलून नवी बसविण्यात आली असून, तीनही बॉयलरचे नुतनीकरण पूर्ण झाले आहे. ऊसाचा रस ते पाक नेणाऱ्या पाइपलाईनमध्येही आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे कामगार रात्रंदिवस दोन पाळ्यांमध्ये कारखाना येथे काम करीत आहेत. चेअरमन रमेश आडसकर आणि व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील स्वतः कारखाना परिसरात तळ ठोकून दररोज आढावा घेत आहेत.

अलीकडेच रीटन बगास कॅरीयर यंत्रणेचे उद्घाटन व्हाइस चेअरमन पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी चेअरमन रमेश आडसकर, कार्यकारी संचालक मरकड आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. अंबासाखरचा गळीत हंगाम यावर्षी सुरू होणार असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.