गणेश भक्तांसाठी सर्व सुविधा उपलब्ध : अंबाजोगाईत कडक पोलिस बंदोबस्त
टीम AM : गणेश विसर्जनाचा महापर्व काही तासांवर येऊन ठेपला असून यासाठी नगरपरिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरुळ तलाव परिसरात गणेश मंडळांसाठी सर्व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे हे कालपासूनचं कर्मचाऱ्यांच्या मदतीने तलाव परिसरात थांबून स्वच्छतेची आणि इतर सोयीसुविधांची देखरेख करत आहेत. तलाव परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची फौज सतत कामाला लागली आहे.
दरवर्षीप्रमाणे विसर्जनावेळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील बहुतांश ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. लहान मूर्ती विसर्जनासाठी हे कृत्रिम तलाव उपयुक्त ठरणार असून पर्यावरणपूरक विसर्जनास प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय मंडळांसाठी पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन यांची पुरेपूर सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना विसर्जनासाठी कुठलीही अडचण येणार नाही. पर्यावरणपूरक विसर्जनासाठीही प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
गणेश भक्तांच्या सोयीसाठी केलेली ही तयारी पाहून शहरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. विसर्जनाची वेळ जवळ येत असताना नगरपरिषदेच्या या जय्यत तयारीचे कौतुक सर्वत्र होत आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत कडक पोलिस बंदोबस्त
अंबाजोगाईत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील प्रमुख चौक, विसर्जन मिरवणुकीचे मार्ग तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखावी, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.


