टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा बस अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात मोरेवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
विजयमाला सरवदे (रा. अंबाजोगाई) या महिला कर्मचारी बसमधून उतरत असताना त्यांच्या साडीचा पदर बसच्या दरवाजाला अडकला. त्यामुळे त्या बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली असून सहकारी कर्मचारी वर्ग हळहळ व्यक्त करीत आहेत. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



