टीम AM : महाराष्ट्रात दशावतार ही एक पारंपरिक लोककला असून ती मुख्यतः कोकण भागात लोकप्रिय आहे. भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित हा नाट्यप्रकार रात्री उशिरा पर्यंत रंगतो. यात धार्मिक कथांचा समावेश असून नृत्य, गायन आणि अभिनय यांचा सुंदर संगम असतो. दशावतारात वेशभूषा, रंगभरण आणि पारंपरिक वाद्यांचा प्रभावी उपयोग केला जातो. ही परंपरा आजही अनेक गावांमध्ये श्रद्धेनं आणि उत्साहानं जपली जाते. मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळा अनुभव घेऊन येणारा ‘दशावतार’ या चित्रपटाचा देखणा आणि थरारक ट्रेलर नुकताच सादर करण्यात आला आहे.
‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या प्रकल्पात मराठीतील अनेक मातब्बर आणि कसलेल्या कलाकारांचा समावेश आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचा अभिनयानं नटलेला हा ट्रेलर अचंबित करणारा आहे. ‘दशावतार’ मध्ये केवळ एक रहस्यमय कथा नसून, त्यातून प्रेक्षकांना लोककला, परंपरा आणि सध्याच्या वास्तवात घेऊन जाणारा एक बहुपर्यायी प्रवास घडेल. ट्रेलर पाहतानाच हे स्पष्ट होतं की ही कथा जुन्या रूढींशी तितक्याच प्रभावशाली पद्धतीनं जोडलेली आहे, जितकी ती आजच्या काळाच्या प्रश्नांशी भिडणारी आहे.
या ट्रेलरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्य, पारंपरिक दशावतारी रंगभूमी आणि जंगलातील दृश्ये आद्यापासून लक्ष वेधतात. मार्मिक संवाद, रोचक पार्श्वसंगीत आणि नेत्रसुखद छायाचित्रणामुळं प्रेक्षक चित्रपटात गुंतून जाईल. ट्रेलर मधील प्रत्येक पात्राची उपस्थिती दबदबा निर्माण करणारी असून त्यामागे एक मोठं रहस्य आहे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही.



