मांडवा परिसरात बिबट्याची दहशत : जनावरांचा पाडला फडशा, पिंजरा लावायची मागणी 

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने जनावरांवर हल्ले केल्याचे समोर आले असून, आतापर्यंत काही जनावरांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

मांडवा परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आपली जनावरे बांधून ठेवताना दहशतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांना बिबट्याच्या दहशतीचा आर्थिक फटका बसला आहे, या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही होत आहे. लहान मुले, महिला आणि शेतकरी बांधव रात्रंदिवस भीतीच्या सावटाखाली जीवन जगत असल्याचे समोर आले आहे.

वनविभागाकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतू, अद्याप तरी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे. मांडवा परिसरातील बिबट्याच्या दहशतीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गावकऱ्यांनी तातडीने वनविभागाने कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.