टीम AM : बीडमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली होती. धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडल्याची घटना घडली. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान, या अपघातात अंबाजोगाई येथील युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिनेश दिलीप पवार असं मृत झालेल्या युवकाचे नाव असून तो शहरातील गांधीनगर भागातील रहिवाशी आहे. दिनेशच्या मृत्यूने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नामलगाव फाट्यावर ही दुर्दैवी घटना घडली. काही गावकरी देवदर्शनाला पायी निघाले होते. यावेळी एका भरधाव कंटेनरने त्यांना चिरडले. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झालेत.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या अपघातातील जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.



