अंबाजोगाईत चाललयं तरी काय ? : तीक्ष्ण हत्याराने तरुणाचा खून, वाचा…

टीम AM : मराठवाड्यातील शांतताप्रिय शहर म्हणून अंबाजोगाई शहराची ओळख आहे. पण ही ओळख जवळपास पुसून गेली असून शहरात दररोज कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना सर्रास घडत आहेत. काल रात्री अंबाजोगाई शहरात एक खळबळजनक घटना घडली. शहरातील रायगड नगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर [वय – 35] या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेआठ च्या सुमारास कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडली. या सिनेमा स्टाईल खूनाच्या घटनेमुळे अंबाजोगाईत चाललयं तरी काय ? अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करित आहेत. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यूवकाचा खून‌ का केला ? याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत. 

दरम्यान, या घटनेमुळे अंबाजोगाई शहराची पुढील वाटचाल कशी राहणार याची चाहूल लागली आहे. अंबाजोगाई शहरात घडलेल्या या घटनेला पोलीसांनी गांभीर्याने घेतले असून शहरात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, अंबाजोगाई शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या घटनांना आळा घालण्यासाठी अंबाजोगाईकरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे, तरच अंबाजोगाईतील सर्वसामान्य माणूस मोकळा श्वास घेऊ शकेल.