टीम AM : बोल्ड, बिनधास्त, ब्युटिफुल अशी ओळख असलेल्या मराठी अभिनेत्री हेमांगी कवीचा आज वाढदिवस आहे. आपल्या अभिनयासोबतच विविध सामाजिक विषयांवर भाष्य केल्याने ती नेहमी चर्चेत असते. ‘गडद जांभळ’ आणि ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्यातील बरीच माहिती वाचायला मिळते. दरम्यान तिच्या शिक्षणाविषयी माहिती करुन घ्या.
हेमांगी कवीचा जन्म 26 ऑगस्ट 1980 रोजी मुंबईत झाला. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आली असून मराठी सिनेसृष्टीत तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. हेमांगीचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण देखील मुंबईतच पूर्ण झाले. सहकार विद्या प्रसारक मंडळ माध्यमिक शाळेत तिने शिक्षण घेतले. त्यानंतर तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तसेच वेब डिझाइनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. मुंबईतील एका खासगी संस्थेत तिने वेब डिझायनर म्हणून आपले करिअर सुरु केले होते. काही काळ तिने तिथे काम केले. पण वेब डिझाइनिंग क्षेत्रात तिचे मन फार काळ रमले नाही.
दरम्यान तिने शिक्षणासाठी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला. येथून 2003 मध्ये तिने बॅचलर ऑफ फाइन आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले. तिला सुरुवातीपासून अभिनयाची आवड होती. 2008 मध्ये रंगबेरंगी सिनेमातून तिने अभिनयातील करिअरला सुरुवात केली. ‘डावपेच’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘गोळा बेरीज’, ‘पिपाणी’ आणि ‘धर्मांतर’ अशा सिनेमांमधून ती दिसली. 2013 मध्ये ‘फू बाई फू’ मध्ये तिने धम्माल उडवून देत प्रेक्षकांची मने जिंकली.



